भंडारा: लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथील शेतकरी आशिष रमेश नंदेश्वर यांच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 75 हजार रुपये लंपास झाल्याची घटना डिसेंबर महिन्यात उघडकीस आली होती. मात्र, शेतकऱ्याने वेळेवर सायबर गुन्हे शाखा व लाखांदूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करून सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर 5 महिन्यांनी त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल शेतकऱ्यांनी सायबर गुन्हे शाखेचे आभार मानले आहेत.
आशिष नंदेश्वर यांनी धान विक्रीचे पैसे म्हणजेच 1 लाख 75 हजार रुपये बँकेत जमा केले होते. मात्र, 21 डिसेंबर रोजी 95 हजार रुपये आणि 22 डिसेंबर रोजी 80 हजार रुपये असे दोन दिवसांच्या अंतरात खात्यातून पैसे गायब झाल्याचा मेसेज मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खाते तपासले असता संपूर्ण रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. घटनेच्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याला पार्सल असल्याचे सांगून एक संशयास्पद फोन आला होता. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. तरीही त्यांच्या खात्यातील रक्कम गायब झाली.
सुशिक्षित आणि सतर्क असलेल्या शेतकऱ्याने तत्काळ सायबर गुन्हे शाखेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत बँकेशी सतत संपर्क साधला. सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक पद्धतीने तपास करत रक्कम परत मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर 5 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पीडित शेतकऱ्याचे संपूर्ण 1 लाख 75 हजार रुपये परत करण्यात सायबर गुन्हे शाखेला यश आले.
देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी अनोळखी फोन, लिंक, मेसेज याकडे दुर्लक्ष करावे. आपल्या बँक खात्याशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच संशयास्पद घडामोडी झाल्यास त्वरित सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे.शेतकरी आशिष नंदेश्वर यांनी सायबर गुन्हे शाखेचे आभार मानले असून, इतर नागरिकांनी देखील अशा घटनांमध्ये घाबरून न जाता धीराने तक्रार करावी आणि सतत पाठपुरावा करावा, असा सल्ला दिला आहे.