भंडारा: शेतशिवारात पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युतप्रवाही तारांच्या संपर्कात आल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर भितीपोटी प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने मृतदेह शेजारील शेतातील विहिरीत फेकण्यात आला.
या प्रकरणी शेतकरी कुटुंबातील तिघांविरुद्ध आंधळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुरुषोत्तम मधुकर राऊत (३९, रा. बपेरा आंबागड, ता. तुमसर) असे मृत युवकाचे नाव आहे. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बपेरा येथील शेतशिवारात ही धक्कादायक ११ सप्टेंबरच्या रात्री घडली.
परिमल धनपाल मसरके (५५), हर्षल परिमल मसरके (२०) आणि गीता परिमल मसरके (सर्व रा. बपेरा, ता. तुमसर) यांनी शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांमध्ये विद्युतप्रवाह सोडला होता. या तारांच्या संपर्कात आल्याने पुरुषोत्तम राऊत यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरीकडे, परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची आणि पोलिस वाहनाचा आवाज ऐकून झालेल्या पळापळीत ही घटना घडल्याची चर्चा आहे.
मृतदेह फेकला शेजारील विहिरीत
पुरुषोत्तम राऊत यांच्या मृत्यूची बाब समोर आल्यानंतर प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने मसरके कुटुंबीयांनी मृतदेह विद्युतप्रवाहाच्या ठिकाणाहून उचलून शेजारील शेतमालक झमनलाल सव्वालाखे यांच्या शेतातील विहिरीत टाकला. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. मृताचे भाऊ उमेश मधुकर राऊत (३४, रा. बपेरा आंबागड, ता. तुमसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०५, २३८ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार प्रकाश थोटे यांनी प्रकरणाची नोंद केली असून, पुढील तपास आंधळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.