भंडारा : शहरातील खात रोडवरील संत जगनाडे चौक परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी एमडी या अमली पदार्थाची वाहतूक करणाºया दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत अमली पदार्थाचा पुरवठा करणाºया आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. या कारवाईत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमन गोविंदा ईश्वरकर (२५, रा. ओमनगर, खात रोड, भंडारा), अद्वेग पराग बोरकर (२०, रा. वैशाली नगर, खात रोड, भंडारा) आणि खैबर सैय्यद जाफरी (२७, रा. बेला, ता. जि. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संत जगनाडे चौक, खात रोड येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी मोटारसायकलवरून अमली पदार्थाची वाहतूक करणारे दोन जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचे १.७ मिलीग्रॅम एमडी अमली पदार्थ, दोन अँड्रॉइड मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी एमडी अमली पदार्थ आरोपी खैबर सैय्यद जाफरी याच्याकडून विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लांडे, हवालदार महाजन तसेच एनडीपीएस पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.