भंडारा : भंडारा जिल्ह्यात खळबळ माजवणाऱ्या नवजात बाळ विक्री प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या नेतृत्वाखाली हे ९ जणांचे पथक आता या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढणार आहे.
सुमारे १५ दिवसांपूर्वी वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अशाच प्रकारे विकल्या गेलेल्या आणखी एका नवजात बाळाचा शोध लावून त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी (वय ३४) सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्या रुग्णालयातील संशयास्पद हालचालींची कसून चौकशी केली जात आहे.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्याने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये ३ अधिकारी आणि ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचे नेतृत्व शिवम विसापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली) यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच सपोनि विवेक सोनवणे, प्रतिभा राऊत, अजय मडावी यासह ६ कार्यक्षम पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.
मुख्य आरोपी डॉ. बाजपेयी याला न्यायालयाने ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, डॉ. बाजपेयी यांच्या रुग्णालयात केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असत. त्यामुळे या बाळ विक्रीच्या काळ्या बाजाराचे धागेदोरे परराज्यातही पसरले आहेत का? याचा तपास आता एसआयटी करणार आहे.
‘नवजात बाळांच्या विक्रीचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात सहभागी असलेल्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. एसआयटीच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करू.’नुरुल हसन, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.