MCOCA Act 
भंडारा

Bhandara Crime | ६ कुख्यात टोळ्यांवर मोक्का, भंडारा पोलिसांची धडक कारवाई : संघटित गुन्हेगारीविरुद्ध आवळले पाश

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: भंडारा जिल्हा पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी अलिकडे ६ कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वतुर्ळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भंडारा शहर पोलिस ठाणे हद्दीत गणेशपूर टोळीप्रमुख चिराग नमोद गजभिये (२८, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, गणेशपूर, भंडारा) याच्यासह सागर भुरे, आकाश बोरकर, श्याम साठवणे, कुणाल भोंगाडे, मोहित  शेंडे, रोशन सिंधीमेश्राम, भावेश  धाबेकर, सचिन साखरकर, अस्मित  कुकडे, साहिल रामटेके, अयुर  थोटे, यश  भागडकर, निल  आंबिलढुके आणि एक फरार आरोपी असे एकूण १५ जण या टोळीत समावेश आहे.

पोलिस ठाणे हद्दीत चंगु मंगू टोळीचा प्रमुख भिमराज मेश्राम (३२) आणि टोळी सदस्य धम्मराज मेश्राम (२९, दोन्ही रा. सेलोटी) ही टोळी वाहने चोरी करणे, बंद घरांचे कुलूप व कडी-कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लांबवणे, जबरीने सोनसाखळी तोडणे, जिवाने मारण्याचा प्रयत्न करणे आणि कर्तव्य बजावणाºया लोकसेवकांना अडथळा निर्माण करणे यांसारख्या गुन्ह्यात सक्रीय होती. टोळीवर मागील १० वर्षांत तब्बल ३५ गुन्हे दाखल आहेत.

लाखनी ठाणे हद्दीत महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. टोळी प्रमुख सम्राट येवले (३३, रा. गोरेगाव, जि. गोंदिया) याच्यासह हर्षल योगेश श्रावणकर, आयुष योगेश श्रावणकर, शुभम श्रीधर भुरे, परमेश्वर गंगाराम पुडके, श्रीकांत रमेश किरपाने आणि एक विधि संघर्षग्रस्त बालक यांचा यात सहभाग आहे. वरील आरोपी अटकेत असून बालक सुधारगृहात दाखल आहे.
भंडारा ठाणे हद्दीत टोळी प्रमुख कपिल गंगाधर खोब्रागडे ( ४१, रा. नंदनवन नागपूर, ह.मु. आंबेडकर वार्ड भंडारा ) हा अटकेत असून टोळी सदस्य मोहम्मद तरबेज मोहम्मद नवाज शेख (३६, रा. पाचपावली, नागपूर) याच्यासह एक फरार आरोपी समाविष्ट आहे. ही टोळी प्रमुखाने भंडारा येथे खोली भाड्याने घेऊन नागपूरहून एम.डी. ड्रग्स मागवून त्याची शहरात विक्री चालवली होती.

पोलिस ठाणे अड्याळ हद्दीत टोळी प्रमुख नरेश महिलांगे (३२, रा. डिप्टी सिग्नल, कळमना, नागपूर) आणि अन्य फरार आरोपींचा समावेश आहे. दिवसा बंद घरांची रेकी करून कुलूप, खिडकीचे रॉड तोडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरी करणाºया या टोळी प्रमुखावर भंडारा, आंधळगाव, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, गोंदिया आणि छत्तीसगड राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे तब्बल ७६ गुन्हे दाखल आहेत. नागपूर शहरात एम.पी.डी.ए. कारवाई होऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा नसल्याने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.


भंडारा ठाणे हद्दीत टोळी प्रमुख मयंक रविंद्र तिवारी (२५, रा. मोठा बाजार, भंडारा), टोळी सदस्य चेतन राजेश तिघरे ( २१, रा. सिव्हील लाईन, भंडारा) आणि रितेश फोमेश कोडवदे ( २५, रा. कस्तुरबा गांधी वार्ड, भंडारा) यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण करून खंडणी मागणे, अनाधिकृत गृह अतिक्रमण, शस्त्रांचा वापर करून दुखापत करणे आणि जबरीने सोनसाखळी तोडणे यांसारखे गंभीर ७ गुन्हे भंडारा, लाखनी, जवाहरनगर, कारधा आणि नागपूर येथील अंबाझारी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. कारागृहात असतानाही नवीन साथीदार तयार करून गुन्हे करण्याची त्याची पार्श्वभूमी आहे.

वर्ष २०१५ ते २०२० या कालावधीत मकोका कायद्यान्वये एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यानंतर वर्ष २०२१ मध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले. वर्ष २०२२ मध्ये पुन्हा गुन्हे नोंदवले गेले. वर्ष २०२३ मध्ये १ गुन्हा दाखल झाला, तर वर्ष २०२४ मध्ये मकोका अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ० होती. वर्ष २०२५ मध्ये १ गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वर्ष २०२६ मधील केवळ जुलै महिन्यापर्यंतच्या काळात मकोका कायद्यान्वये तब्बल ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून गेल्या १० वर्षांत मकोका कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या १० इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT