Married Woman End Life Tumsar
भंडारा : तुमसर शहरातील आझादनगर परिसरात २१ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. ११) दुपारी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून वाघाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खुशी राहुल वाघाडे (वय २१) असे मृत महिलेचे नाव आहे.
बुधवारी दुपारी २:३० वाजता खुशीने घरी गळफास घेतल्याचे आढळून आले. मूळची कन्हान येथील रहिवासी असलेल्या खुशीचा दोन वर्षांपूर्वी राहुल वाघाडेशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही काळातच संसाराला गालबोट लागले. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे घरात खटके उडत. कौटुंबिक वादाचे वातावरण राहत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घटनेतील सर्वांत क्लेशदायक बाब म्हणजे खुशीच्या पश्चात नऊ महिन्यांचे बाळ आहे. आईच्या अकाली निधनामुळे त्या निरागस बालकाचे मायेचे छत्र कायमचे हरपले. नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पती राहुल लक्ष्मीकांत वाघाडेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.