भंडारा: पुणे जिल्ह्यात विषारी दारुमुळे अनेकांचे प्राण गेल्यानंतर अवैध दारु निर्मिती आणि तस्करीवर कारवाईला जोर आला. परंतु, भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीवरील आंतरराज्यीय पुलावरुन होणाºया दारु तस्करीवर मात्र अद्याप अंकूश लागला नाही. या पुलावर तपासणी नाका नसल्यामुळे दारुतस्करांना रान मोकळे आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यासारखी घटना भंडारा जिल्ह्यातही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या बावनथडी नदी काठावरील देवनारा-बडपानी पुलावर तपासणी नाका बसविण्यात आले नाही. त्यामुळे मध्यप्रदेशातील गावांमधून भरदिवसा सायकल, मोटारसायकल व अन्य वाहनांमध्ये मोहफुलासह, अवैध देशी, विदेशी दारू महाराष्ट्रात सर्रास आणली जात आहे. याकडे पोलिसांसह, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून तस्करांना अभयदान दिल्या जात आहे.
परप्रांतातून येणाºया देशी-विदेशी दारू व अन्य प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विविध ठिकाणी असे तपासणी नाके उभारले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकांवर आदिवासी बहुल देवनारा हे गाव असून या गावाला लागूनच मध्यप्रदेशची सीमा आहे. परंतु महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या पुलावर अद्यापही तपासणी नाका बसविण्यात आले नाही.
महाराष्ट्र सीमेलगत चिखली, देवनारा, कुरमुळा, डोंगरी बुजरूक, आसलपाणी, आलेसुर, लेंडेझरी हा क्षेत्र नैसर्गिक वन संपदेने व खनिज संपत्तीने नटलेला आहे. जंगलव्याप्त क्षेत्र असल्याने कोणताही अधिकारी इकडे फिरकण्यास तयार नाही. परिणामी मध्य प्रदेशात मिळणारी देशी व विदेशी दारू ही स्वस्त व कमी दरात मिळत असल्याने भरदिवसा महाराष्ट्रात आणली जात आहे. इतकेच नव्हे तर माफक दरात मिळणारा मोहफुल देखील महाराष्ट्रात सर्रास आणले जात असून या ठिकाणी वनविभागाचे तसेच पोलिसांची चौकी नसल्याने तस्करांना मोकळीक मिळाली आहे.
देवनारा बडपानी हा आंतरराज्यीय पूल बांधल्यापासून येथे तपासणी नाका नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सर्रास मोहफूल, देशी विदेशी दारू, मग्निज, डोलामाईटसह वन संपदेची तस्करी सुरू आहे. या पुलावर तपासणी नाका उभारून नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याची गरज आहे.-कृष्णकांत बघेल, जिल्हा परिषद सदस्य भंडारा