भंडारा: माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. एका १५ वर्षांच्या निष्पाप अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचा गैरफायदा घेत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला. त्या व्हिडिओच्या बळावर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली.
मुलीने या नराधमांना कडाडून विरोध करताच, त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येणाºया गावात एका १५ वर्षीय पीडित मुलीला आरोपी भावेश यादव (वय १९, रा. सिंडीकेट कम्प, डोंगरी माईन्स) याने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही प्रेमाचे आमिष दाखवले. २४ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री भावेश पीडितेच्या घरी गेला. आधीच दबा धरून बसलेले त्याचे मित्र क्षितीज पटले (वय १९, रा. डोंगरी बुज), बाल्या उर्फ करण चौधरी (वय २१) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर दोन विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुले अचानक मुलीच्या घरात घुसले
यावेळी आरोपी क्षितीज पटले याने त्याच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा व्हिडिओ शूट केला.
व्हिडिओ काढल्यानंतर सदर आरोपींनी पीडित मुलीला गाठून, तो व्हिडिओ दाखवून भीती दाखविली आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
मात्र, मुलीने धैर्य दाखवत त्यांच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या नराधमांनी पीडितेची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने तो आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पीडितेच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर तिने गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ठाणेदार शरद शेवाडे यांनी त्या नराधमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.