भंडारा: एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी पोक्सो आणि अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील साकोली येथील श्याम हॉस्पिटलचा संचालक डॉ. देवेश अग्रवाल अखेर सोमवारी न्यायालयापुढे शरण आला. गेल्या २० दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या शोधासाठी जिल्हा पोलिसांचे विविध पथक शेजारचे राज्य आणि जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आले होते. तसेच त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीससुद्धा जारी करण्यात आली होती.
९ जुलै रोजी साकोली येथील श्याम हॉस्पिटलमध्ये पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी आली होती. त्यावेळी डॉ. देवेश अग्रवाल याने सोनोग्राफीच्या नावाखाली आई आणि परिचारिकेला बाहेर पाठवून एकांतात मुलीसोबत अश्लिल वर्तन केले होते. त्यानंतर मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यावर साकोली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी डॉक्टरविरोधात पोस्को आणि अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून डॉ.देवेश अग्रवाल फरार झाला होता.
सदर घटनेनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांनी निवेदने देऊन पोलिसांवर दबाव निर्माण केला होता. पोलिसांनीही आरोपीला पकडण्यासाठी ७ पथके तयार करुन गोंदिया, अमरावती, पुणे, हैदराबादपर्यंत त्याचा शोध घेतला. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीससुद्धा जारी करण्यात आली होती. परंतु, तरीही तो सापडत नव्हता. अखेरीस त्याने सोमवारी संध्याकाळी भंडारा येथे न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले.