भंडारा : शहरातील आंबेडकर वॉर्डातील एका अंगणवाडीत अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारप्रयत्न प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला असून, लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्ट) चालवला जाणार आहे.
६ ऑगस्ट रोजी भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डातील एका अंगणवाडीत रोहित संजय वासनिक (वय ३०, रा. आंबेडकर वॉर्ड, भंडारा) या नराधमाने तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. समाजाच्या सर्वच स्तरांतून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. विविध संघटनांनी मोर्चे काढून आरोपीला फाशी किंवा कठोर शिक्षेची मागणी लावून धरली होती.
घटनेनंतर आरोपीने स्वतःला दगडाने मारून जखमी करून घेतले होते. वाढता जनक्षोभ आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता आरोपीला उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी अवघ्या आठ दिवसांत तपास पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले होते.
रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली व जबाब नोंदवला. तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तांत्रिक व कागदोपत्री तपास आता पूर्ण झाला असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले जाणार आहे. हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून पीडित बालिकेला अल्पावधीत न्याय मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने तपासात पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंच म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक पैलूची सखोल तपासणी करून पंचांसमक्ष सर्व पुराव्यांची कायदेशीर पूर्तता व पुष्टी करण्यात आली आहे.