प्रातिनिधीक फोटो  (File Photo)
भंडारा

Bhandara Bribe case : सात हजारांची लाच घेताना महिला ग्रामसेवक जाळ्यात; भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला ग्रामसेवकाला भंडाराच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी (ता. ६) ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजू मधुकर अंबादे (वय ४१, रा. दिघोरी मोठी) असे लाचखोर महिला ग्रामसेवकाचे नाव आहे. ती मोहरणा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

तक्रारदार तरुण आपल्या आईच्या नावे ग्रामपंचायत मोहरणा क्षेत्रातील शेतात कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म) सुरू करणार होता. यासाठी त्याला ग्रामपंचायतीच्या 'एनओसी'ची आवश्यकता होती. याकरिता त्याने ग्रामपंचायत अधिकारी रंजू अंबादे यांच्याकडे अर्ज सादर केला होता. मात्र, 'एनओसी' अर्जंट हवी असल्यास दहा हजार रुपये लागतील, अन्यथा सात हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी अंबादे यांनी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपीने सात हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या गेटसमोर, साकोली ते वडसा रोडवर सापळा रचला. या सापळ्यात रंजू अंबादे यांना तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

भंडारा एसीबीचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक नितेश देशमुख, पोलीस हवालदार अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, पोलीस नाईक मयूर सिंगनजुडे, विष्णू वरठी, सुमेध मेश्राम आणि महिला पोलीस अंमलदार दुर्गा साखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे तालुक्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT