भंडारा - पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास कमी करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या करडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. प्रफुल्ल चोखोबा वालदे असे या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या विरोधात आणि त्यांच्या मोठ्या भावाच्या विरोधात करडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार प्रफुल वालदे हे करत होते. तपासादरम्यान, प्रफुल वालदे यांनी गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदवली.
या तक्रारीच्या आधारे २९ जून २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. यात हवालदार वालदे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मात्र, सापळा कारवाईदरम्यान तक्रारदारावर संशय आल्याने हवालदाराने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने करडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर व भंडाराचे पोलिस उपअधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितेश देशमुख, मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, प्रतिक उके, मयुर सिंगणजुडे आणि पंकज सरोते यांनी केली.