भंडारा - लाखनी तालुक्यातील मोगरा येथे प्रियकराने विधवा प्रियसीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना आज शुक्रवारी (ता. २१) ला उघडकीस आली. घटनेनंतर प्रियकर आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात येवून घडलेला प्रकार सांगून आत्मसमर्पण केले आहे. पुष्पा ज्ञानेश्वर बनकर असे मृत महिलेचे नाव असून खुशाल पडोळे (वय ३० ) असे मारेकरी प्रियकराचे नाव आहे. खून कोणत्या कारणाने झाला याचा लाखनी पोलीस शोध घेत आहेत.
मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या २ मुलांचा सांभाळ करीत होती. गेल्या ७-८ वर्षापूर्वी तिच्या पतीने शारीरिक व्याधीला कंटाळून आत्महत्या केली होती. आज शुक्रवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले. व नंतर आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा खून केला. लगेच त्याने पोलीस स्टेशन गाठत घडलेली हकीकत सांगितली व केलेल्या खुनाची कबुली दिली. घटनास्थळी लाखनी पोलिसांची चमू तसेच फोरेन्सिक चमू पोहचली असून तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहचले असून घटनेसंदर्भातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरु होते.