Bhandara Iron Gate Collapse Minor Girl Death
भंडारा : खेळताना अचानक घराच्या आवारातील लोखंडी गेट अंगावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन एका ६ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पवनी तालुक्यातील भोजापूर येथे घडली. शिवन्या विशाल पंचभाई असे मृत बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर समृतवार यांच्या घराच्या आवारातील भिंतीला लोखंडी गेट बसवण्यात आलेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिवन्या ही या लोखंडी गेटवर झोके घेत असताना अचानक संपूर्ण गेट तिच्या अंगावर कोसळले. गेट थेट अंगावर पडल्यामुळे तिच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर जखमी शिवन्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत शिवन्या ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. गेल्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाचा आनंद ओसरत नाही तोच महिनाभरातच या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने पंचभाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भोजापूर गावावर शोककळा पसरली आहे.