भंडारा : जिल्ह्यात खळबळ माजवून देणाऱ्या बाळविक्री प्रकरणाचा तपास आता अधिक गडद झाला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर म्हणवून घेणा-या नितेश वाजपेयी याची वैद्यकीय पदवीच बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस आता त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची सखोल तपासणी करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली.
बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणात तपासाचा ओघ जसा वाढत आहे, तसे नवनवीन खुलासे होत आहेत. पहिल्या बाळविक्रीच्या घटनेनंतर, डिसेंबर महिन्यातही एका बाळाची ४ लाख ७० हजार रुपयांना विक्री झाल्याचे उघड झाले आहे. २१ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू पालकांना लक्ष्य करून ही बाळांची खरेदी-विक्री केली जात होती.
वाजपेयी याचे रुग्णालय गोंदियात असले तरी, या जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील रुग्णही या रुग्णालयात येत असत. या बाळविक्रीच्या रॅकेटची पाळेमुळे परराज्यातही पसरलेली असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
सहा आरोपींना अटक : या प्रकरणात आतापर्यंत डॉक्टरसह सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आज मालती वाघमारे (रा. पांढराबोडी) या महिलेला अटक करण्यात आली.
रुग्णालय नोंदणीवर प्रश्नचिन्ह : न्यू बालाजी रुग्णालयाच्या अधिकृत नोंदणीबाबत गोंदियाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवण्यात आले आहे.
कोठडीत वाढ होण्याची शक्यता : मुख्य आरोपी डॉ. वाजपेयी याची पोलीस कोठडी संपत असून, पोलीस न्यायालयात पुन्हा ११ दिवसांच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
‘आर्थिक विवंचनेत असलेल्या पालकांचा फायदा घेऊन हा डॉक्टर लाखो रुपये उकळत होता. केवळ दोनच नव्हे, तर बाळविक्रीची आणखीही अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. डॉक्टरच्या पदवीबाबत शंका असल्याने आम्ही तांत्रिक तपास करत आहोत.’— नुरुल हसन, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि तपासी अधिकारी शिवम विसापूरे यांचीही उपस्थिती होती.