भंडारा : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नवजात बाळ विक्री प्रकरणातील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली होती तर मुख्य सूत्रधार असलेल्या डॉ. वाजपेयी याचा शोध सुरू होता. 17 फेब्रुवारी रोजी त्याच्या अटकपूर्व जामीनावर भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. अटकेपासून बचावासाठी धडपडत असलेल्या डॉक्टरचे एकेक प्रकरण पुढे येत असल्याने त्याने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. सद्या त्याची प्रकृती स्थिर असून भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.वरठी पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे हिने आपल्या घरी १० दिवसांची नवजात बालिका आणली असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळाली होती. तिने नवजात बालिकेला गोंदिया येथून आणल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते.
दुसऱ्या दिवशी वरठी पोलिस तिच्या घरी गेले असता ती बालिकेसह कारमधून पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला मोहाडी येथील कुशारी फाट्याजवळ अडविले. त्या कारमध्ये पौर्णिमा सतिश धुर्वे रा. रामनगर गोंदिया या महिलेकडे ती नवजात बालिका आढळून आली. तिने गोंदिया येथील डॉक्टरच्या सांगण्यावरुन बालिकेला घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. मुख्य आरोपी डॉक्टर वाजपेयी हा फरार होता. त्याच्या जामीन अर्जावर 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती.
दरम्यान शनिवारी रात्री मध्यप्रदेशातील कटंगी येथून भंडारा कडे स्वतःच्या वाहनाने येत असताना डॉ. नितेश वाजपेयी याने स्वतःच्या पोटावर आणि शरीरावर ब्लेडने वार करून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या डॉक्टरला आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्याच्यावर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो बरा झाल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक गूढ उकलले जाणार आहेत.