भंडारा -: तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी, २९ मे रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात काटेबाम्हनीचे उपसरपंच भगवान कचरू आगाशे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेमुळे हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान आगाशे हे आपली दुचाकी (क्रमांक M.H.३६ N.७५४१) रामटेक-खापा मार्गावरील आपल्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला उभी करून ओझे बांधत होते. ते मोटारसायकलला बांधलेले दोर सोडत असतानाच, रामटेककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्रमांक M.H.१५ E.T.९२२५) त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यात आगाशे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. उपसरपंचांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली असून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी जमावाला शांत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मृत भगवान आगाशे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने काटेबाम्हनी गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे नागरिक आता असुरक्षित झाले असून, वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.