भंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल कंपनी परिसरात रेती, माती आणि मॅगनीज स्लॅगचा ढिगारा अंगावर पडल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत तीन महिला मजूर ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातामुळे कंपनी व्यवस्थापन, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या दुर्घटनेत कांचन सेलोकर (वय ५०), चंद्रकला टिचकुले (वय ५२) आणि सुमन वहिले (वय ५५, सर्व रा. माडगी) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने कांचन सेलोकर आणि चंद्रकला टिचकुले यांना पुढील उपचारांसाठी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माडगी येथील युनिव्हर्सल कंपनी परिसरात गेल्या ५० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मॅगनीजची साठवणूक करण्यात आली आहे. मागील २० ते २२ वर्षांपासून कारखाना बंद अवस्थेत असला तरी, येथे साठवून ठेवलेल्या टाकाऊ पदार्थांमधून (वेस्ट मटेरियल) मॅगनीज काढण्याचे काम कंत्राटी पद्धतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या ठिकाणी माडगी व परिसरातील सुमारे ३० ते ३५ महिला-पुरुष मजूर रोजंदारीवर काम करत आहेत. घटनेच्या दिवशी तीन महिला मजूर स्लॅगच्या ढिगाऱ्याजवळ काम करत असताना अचानक ढिगारा कोसळला आणि त्याखाली गाडल्या गेल्या. यात तिन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हेल्मेट किंवा सेफ्टी किट दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. एवढ्या धोकादायक ठिकाणी मजुरांचा जीव धोक्यात घालून काम करून घेतले जात असल्याने कामगार सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कामगार विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या जीवघेण्या कामाकडे प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्ष का केले, असा संतप्त सवालही नागरिक विचारत आहेत.