भंडारा : 'शुभमंगल सावधान'चे अक्षत पडले, घरात नवीन सून येणार म्हणून सर्वच उत्साहात होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्न आटोपून आनंदाने गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाने झडप घातली. सौंदड फाट्याजवळ भरधाव ट्रकने ओम्नी व्हॅनला दिलेल्या भीषण धडकेत मायलेकींसह नवरदेवाच्या मामा-मामींचा जागीच मृत्यू झाला. या थरारक अपघातामुळे नान्हे आणि नगरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भंडारा जिल्हा हळहळत आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुदर्शन नान्हे आणि भावड येथील दुर्गा पचारे यांचा विवाह गुरुवारी रात्री कोसरा येथील बिलीवर्स चर्चमध्ये पार पडला. विवाहसोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी ओम्नी व्हॅनने (क्रमांक नमूद नाही) अड्याळकडे परतत होती. रात्री ९:१५ च्या सुमारास व्हॅन सौंदड फाट्याजवळ पोहोचली असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने व्हॅनला अक्षरश: चिरडले. ही धडक इतकी भीषण होती की, व्हॅनचा चक्काचूर झाला आणि त्यातील पाच जणांचा जागीच प्राण गेला.
या भीषण अपघातात दुर्गा ऊर्फ शिला देवराम नगरे (४५), त्यांची कन्या नैना देवराम नगरे (२१) आणि श्वेता पुरुषोत्तम नगरे (१७, सर्व रा. अड्याळ) या मायलेकींचा अंत झाला. तसेच नवरदेवाचे मामा प्रभाकर चाचेरकर (५५) आणि मामी मुन्नी प्रभाकर चाचेरकर (४५, रा. वेलतूर) यांचाही या अपघातात मृत्यू झाला. याशिवाय, रक्षा खेडकर, नेहा नान्हे, उमेश सोनवाने आणि चालक सोहम गडेकर हे चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सकाळी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. अड्याळ येथे नगरे कुटुंबातील तिघींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर चाचेरकर पती-पत्नीवर वेलतूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यविधी पार पडले. यावेळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते, तिथे आता फक्त हुंदके ऐकू येत आहेत.
अपघातानंतर अड्याळ पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी ट्रक चालक दुर्गेश लखनलाल यादव (४०, रा. बिलासपूर, छत्तीसगड) याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण करत आहेत. एका निष्काळजीपणामुळे दोन हसतीखेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.