भंडारा : सोयाबीनच्या हंगामासाठी नागभीडकडून भूयारकडे येणाऱ्या मेटॅडोरला मागेहून टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर २४ मजूर जखमी झाले. ही घटना भूयार-कान्पा मार्गावर मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्यादरम्यान घडली. गायत्री रोशन हेमने (वय ३६, डोंगरगाव, ता. नागभीड) असे मृत महिलेचे नाव आहे.
सध्या सोयाबीन पीक कापनीचा हंगाम सुरू आहे. यासाठी सदर मजूर भुयारमार्गे धुरखेडा तालुका उमरेड येथे जात होते. दरम्यान मेटॅडोरमध्ये मजुरांना नेत असताना भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर टिप्परने धडक दिल्याने मेटॅडोर उलटला. ही माहिती नागभीड पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली. जखमींना जवळच्या भुयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिथून पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान महिला मजूराचा मृत्यू झाला. परिस्थिती गंभीर असल्याने उर्वरित २४ मजुरांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे. घटनेचा तपास नागभीड व पवनी पोलिस करीत आहेत.