भंडारा : दोन हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल  File photo
भंडारा

भंडारा : दोन हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : अपघातप्रकरणी पोलिस ठाण्यात जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई आज बुधवारी (दि. १९ सप्टेंबर ) रोजी वरठी पोलिस ठाण्यात करण्यात आली. राजेश सदाशिव बाभरे (वय ५६) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा मालकीचा टिप्पर असून ते रेतीची वाहतूक करतात. त्यांच्या टिप्परचालकाविरुद्ध वरठी पोलिस ठाण्यात १ सप्टेंबर रोजी अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा टिप्पर पोलिस ठाण्यात जप्त करुन ठेवण्यात आला होता. दरम्यान, टिप्पर सोडविण्यासाठी वरठी पोलिस ठाण्याचे कर्मचारी पाच हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार ६ सप्टेंबर रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

त्याच दिवशी या तक्रारीची पडताळणी केली असता वरठी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश बाभरे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडअंती दोन हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी सापळा कारवाईदरम्यान राजेश बाभरे यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. याप्रकरणी त्यांच्याविरोधात वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक अमित डहारे, संजय कुंजरकर, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, शिलपेंद्र मेश्राम, नरेंद्र लाखडे, चेतन पोटे, मयूर शिंगणजुडे, राजकुमार लेंडे, विवेक रणदिवे, राहुल राऊत, अभिलाषा गजभिये यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT