अवैध तांदळाची वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले तांदूळ  Pudhari Photo
भंडारा

भंडारा : अवैध वाहतूक करताना २९ हजार क्विंटल तांदूळ जप्त

करण शिंदे

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून वाशिमवरून गोंदिया येथे अवैध तांदूळ वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेने ट्रकमधून २९ हजार ६४० क्विंटल तांदूळ बुधवारी (दि.11) पकडले. यावेळी ट्रकसह एकूण २५ लाखांचा माल जप्त करण्यात आला असून, यामध्ये पाच जणांवर कारवाई करून चालकाला अटक करण्यात आली. या कारवाईतून अवैध तांदळांचे गोंदिया कनेक्शन उघड झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांना नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावरून ट्रकमधून बेकायदेशिरपणे तांदळाची वाहतूक होत असल्याची मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पंजरवाड, पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार चांदोरे, हवालदार नितीन महाजन, राजेश पंचबुद्धे, अजय बारापात्रे, संदीप मते, रमेश बेदुरकर, अंमलदार मंजेश माळोदे यांचे पथक तयार करून त्यांना त्वरित कारवाईसाठी रवाना केले.

या पथकाने शहरातील नागपूर नाका येथे बुधवारी (दि.11) दुपारी नागपूरकडून आलेला ट्रक (क्रमांक एमएच२६/सीएच ७३७३) येताना दिसला. पोलिसांनी चालकाला ट्रक थांबविण्याचा इशारा केला. चालकाने रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवला. तेव्हा पोलिसांनी त्याला ट्रकमध्ये असलेल्या मालाबाबत विचारपूस केली. त्यावरून त्याने उडवाउडविची उत्तरे दिल्याने पोलिस पथकाने ट्रकवर झाकलेली ताडपत्री बाजूला करून तपासणी केली. तेव्हा या ट्रकमध्ये अंदाजे २९,६४० किलो तांदूळ मिळूत आला.

या तांदळाची शहानिशा करण्याकरीता तहसीलदार भंडारा यांना माहिती देवून त्यांच्या कार्यालयातील निरीक्षक अधिकारी यांच्यामार्फत ट्रकमध्ये असलेला तांदुळाची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अन्न निरीक्षकांनी ट्रकमध्ये असलेले तांदूळ बेकायदेशिर असल्याचे सांगितले. चालकासह ट्रक मालक, नांदेड व वाशिम येथून माल पाठविणारे दोघे व गोंदिया येथील राईस मिल मालक अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

नांदेड - वाशिमवरून गोंदियाला रवाना

ट्रक चालक अकबर निजाम शेख (वय ३२, रा. ममदापूर, जि. बिड) याला विचारपुस केली असता ट्रक मालक नदीम खान रा. नांदेड याच्या सांगण्यावरून नांदेड येथील सैफ भाई व वाशिम येथील भरत जाधव यांच्याकडून ट्रकमध्ये तांदूळ भरल्याचे सांगितले. हे तांदूळ राहुल राईस मिल गोंदियाचे मालक राजेश अग्रवाल याच्याकडे घेवून जात असल्याचे सांगितले. फिर्यादी अन्न निरीक्षण पोचीराम रामा कापडे (वय ४५) यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT