भंडारा जिल्ह्यातील १०४७ शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना file photo
भंडारा

भंडारा जिल्ह्यातील १०४७ शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना

पुढारी वृत्तसेवा

बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची गंभीर दखल घेतली जात आहे. परंतु, भंडारा जिल्ह्यातील १२९७ शासकीय व अनुदानित शाळांपैकी केवळ २५० शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित १०४७ शाळा अजुनही सीसीटीव्ही कॅमेरेविना आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार या सर्व शाळांना महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा गावाबाहेर, निर्जन आवारात आणि जंगलाला लागून आहेत. शाळांमध्ये एकाचवेळी शेकडो विद्यार्थी असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेकडे प्रत्येकवेळी लक्ष देणे शाळेतील कर्मचयांना शक्य होत नाही. अशा स्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यापूर्वीच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते.

मोजक्याच शाळांच्या व्यवस्थापनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. जिल्ह्यात एकूण १२९७ शाळा, ७९४ जिल्हा परिषद आणि ५०३ इतर शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यापैकी केवळ २५० शाळांमध्ये विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निरिक्षणाखाली आहेत. शासन आदेशानंतर जिल्हा वार्षिक योजनेचा पाच टक्के राखीव निधी वापरून शाळांना महिनाभरात शाळांमध्ये कॅमेरे बसवावे लागणार आहेत. शाळेतील दृश्यमान भाग, प्रांगण आणि विद्यार्थी ज्या ठिकाणी वेळ घालवतात. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. काही आक्षेपार्ह घटना दिसल्यास पोलिसांना कळवावे लागेल. शाळांमध्ये नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी लागणार आहे.

कॅमेरे न लावल्यास कडक कारवाई शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना करण्यात आली आहे. २१ ऑगस्टच्या शासन आदेशानुसार सर्व शाळांना महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत. यासंबंधीचा आदेश जारी केला जाईल. आदेशाचे पालन न केल्यास शाळांची मान्यता रद्द करण्यासारखा निर्णय घेतला जाईल.
-रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, भंडारा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT