विदर्भ

भंडारा: वैनगंगा नदीत नाव बुडाली; ६ जण बचावले

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : कान्होबा विसर्जनासाठी नदीपात्रात गेलेल्या भाविकांची नाव बुडाली. सुदैवाने शेजारी असलेले नावाडी धावून आले आणि बुडालेल्या सर्व सहा जणांना वाचविण्यात यश आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भंडारा तालुक्यातील खमारी येथील वैनगंगा नदीपात्रात घडली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमीत्त भाविकांनी श्रीकृष्णाची स्थापना केली होती. शुक्रवारी कान्होबाचे विसर्जन करण्यात आले. खमारी येथे वैनगंगेचे विशाल पात्र असल्याने गावकरी नदीपात्रात जाऊन विसर्जन करतात. परंतु, सध्या वैनगंगेची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी नदीकाठावर अनेक नावेची व्यवस्था केली गेली होती. विसर्जन करण्यासाठी गावातील सुमारे २०० नागरिक उपस्थित होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास एक नाव विसर्जनासाठी नदीपात्रात गेली.

त्यात खमारी येथील गजानन पेशने, निकेश पेशने, माणिक केजरकर, मंगेश मोहतूरे, प्रमोद पवनकर आणि नावाडी रमेश मेश्राम असे ६ व्यक्ती होते. नदीपात्रात काही अंतरावर गेल्यानंतर अचानक नाव पाण्यात उलटली. त्यामुळे सर्व सहाही जण पाण्यात बुडाले. हा प्रकार घडताच नदीपात्रात असलेले अन्य नावेतील ढेकल मेश्राम, प्रज्वल मेश्राम, शरद मेश्राम, बिरजू मेश्राम, कुणाल मेश्राम आणि मुन्ना मांढरे हे नावाडी त्यांच्या बचावासाठी धावून गेले. नावाड्यांच्या मदतीने सर्व सहा जणांचे प्राण वाचविण्यात आले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

या संपूर्ण घटनेचे अनेकांनी चित्रीकरण केले. शनिवारी या घटनेचा व्हिडीओ व्‍हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली. वैनगंगा नदीला अलिकडेच पूर आला होता. आताही वैनगंगा नदीची पातळी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नदीपात्रात जाणे धोक्याचे ठरू लागले आहे.

२००९ ची पुनरावृत्ती टळली

सन २००९ मध्ये भंडारा तालुक्यातील खमारी, सुरेवाडा येथील महिला रोवणीसाठी वैनगंगा नदीपलिकडील शेतात जात असताना नाव पलटून ३४ महिला मृत्यूमुखी पडल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाल्यानंतर वैनगंगा नदीकाठावरील गावकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना आखल्या जातील अशी अपेक्षा होती. परंतु, १३ वर्षानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. विसर्जनासाठी गेलेल्यांच्या मदतीला अन्य नावाडी धावून गेले नसते, तर त्या घटनेची पुनरावृत्ती ठरली असती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT