२४ तासात अमरावतीत तिघांची निर्घृण हत्या Pudhari Photo
अमरावती

२४ तासात अमरावतीत तिघांची निर्घृण हत्या

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शहरात गेल्या चोविस तासात वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.६) सायंकाळी जयस्तंभ चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आली, तर सोमवारी (दि.७)  दुपारच्या सुमारास मसानगंज परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तसेच बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राममेघे कॉलेजवजळील एका शेतात सोमवारी (दि.७) सायंकाळी २५ ते ३० वयोगाटील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. शरीरावर घाव असल्याने त्याची देखील हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनांमुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

जयस्तंभ प्रकरणी पाच अल्पवयीन ताब्यात 

जुन्या वैमनस्यातून सहा अल्पवयीन मुलांनी चाकूने हल्ला करून, एका तरुणाची रविवारी जयस्तंभ चौकात हत्या केली होती. प्रेमराज उर्फ मोंटू अनिल गोले (वय २५, रा. दत्तवाडी, महाजनपुरा, खोलीपुरी गेट) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जयस्तंभ चौकात घडली. या घटनेची तक्रार अजय विजयराव वानखडे (वय २५, रा. खरकाडीपुरा) यांनी ६ ऑक्टोंबर रोजी रात्री शहर कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. यातील चार जणांना रविवारी ताब्यात घेण्यात आले होते, तर एकाला सोमवारी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली आहे. तर एका मुलाचा शोध पोलिस घेत आहेत. 

मसानगंज येथे जुन्या वैमनस्यातून तरुणाला संपविले

सोमवारी (दि ७) दुपारी मसानगंज परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. वैभव हुकुमचंद पटेरिया (वय २४, रा. मसानगंज) असे मृताचे नाव आहे. प्रविणनगरातील रहिवासी शुभम मोहोड नामक तरुणासोबत काही दिवसांपूर्वी वैभवचा वाद झाला होता. त्यावेळी नागपुरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याची चौकशी पोलिस करीत होते. अशातच सोमवारी दुपारी वैभव पटेरिया हा मसानगंज परिसरातील वर्मा ज्वेलर्स नामक दुकानाजवळ उभा असताना, त्याच्यावर शुभम मोहोड व त्याच्या काही साथीदारांनी अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला होता. या घटनेच्या माहितीवरून नागपुरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून वैभवला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले होते. तेथे डॉक्टरांनी वैभवला तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणात पोलिसांनी शुभम मोहोडसह त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. 

बडनेरा हद्दीतही तरुणाची हत्या

बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राममेघे कॉलेजवजळील एका शेतात २५ ते ३० वयोगाटील एका तरुणाचा मृतदेह सोमवारी (दि.७) सायंकाळी आढळून आला. या तरुणाच्या अंगावर शस्त्राच्या जखम असल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा संशय बडनेरा पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसून, पोलिस ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT