Wrestler Prapti Vighne death
अमरावती : अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविणाऱ्या जिल्ह्यातील तिवसा येथील कुस्तीपटू प्राप्ती विघ्ने (वय २२) या तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (दि.५) झाला आहे. या धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, प्राप्तीला सुरुवातीला उलट्या व हात पाय दुखण्याचा त्रास होत होता. तेव्हा ती अमरावतीला होती. दरम्यान तिने आपल्या घरच्यांना फोन करून सांगितले. त्यामुळे तिच्या भावाने तिला अमरावतीवरून तिवसा येथे घरी आणले. घरी आराम करत असतानाच सोमवारी दुपारी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
दररोज व्यायाम आणि कुस्ती सारख्या खेळासाठी तंदुरुस्त राहणाऱ्या प्राप्तीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्ती विघ्ने ही प्रसिद्ध असलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आखाड्यात कुस्तीचा अभ्यास करत होती. तसेच ती पंचशील व्यायाम प्रसारक मंडळ तिवसा येथील सदस्य होती. वयाच्या 22 व्या वर्षी एका तरुण कुस्तीपटूच्या अचानक निधनाने कुस्ती क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात शोक संवेदना व्यक्त होत आहे.