अमरावती

Vidarbha Rain Update : विदर्भाच्या नंदनवनात सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पाऊस; पर्यटननगरी चिखलदऱ्यात पाणीटंचाईचे सावट

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : पावसाळा सुरू होऊन ५० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये अल्प प्रमाणातच पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच कारणामुळे 'विदर्भाचे नंदनवन' व पर्यटननगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरात सध्या २ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा चिखलदऱ्यात सरासरीपेक्षा तब्बल ४३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

शहरात सुमारे ९१८ नळ जोडण्या (कनेक्शन्स) आहेत. या पर्यटननगरीला प्रामुख्याने सक्कर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाअभावी या तलावात केवळ ५ फूट पाणी साठले आहे. संपूर्ण तालुक्यात (तहसीलमध्ये) देखील सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. २२ जुलैपर्यंत तालुक्यात सरासरी ५०८.० मिमी पाऊस होणे अपेक्षित असते. परंतु यंदा केवळ २८७.२ मिमी (५६.५ टक्के) पाऊस झाला आहे.

स्थानिक माहितीनुसार, चिखलदऱ्यात दरवर्षी जानेवारीनंतर पाणीटंचाई अधिक गडद होते. त्यावेळी सक्कर तलावासह इतर जलस्रोत आटू लागतात नि उन्हाळ्यात ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. एरवी पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच पाणीपुरवठा नियमित होत असतो. परंतु, यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तलाव भरलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (MJP) खबरदारी म्हणून आतापासूनच २ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी जास्त असल्याने पाण्याची मागणीही कमालीची वाढली आहे.

चिखलदर्‍यात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस:

  • चिखलदरा सर्कल: ५०८.० पैकी ३८४.५ मिमी

  • सेमाडोह: ५०८.० पैकी ३४३.३ मिमी  

  • चुरणी: ५०८.० पैकी २०१.५ मिमी

  • टेंभूसोडा: ५०८.० पैकी ३०७.८ मिमी

  • गोलखेडा बाजार: ५०८.० पैकी केवळ १९७.९ मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT