The police have arrested the fraudsters in the name of share market.
शैअर मार्केटच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. Representative Photo
अमरावती

शेअर मार्केटच्या नावावर फसवणूक करणाऱ्या 9 जणांना अटक

करण शिंदे

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: एका महिलेला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूकसाठी 74 लाख 19 हजार 450 रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील नऊ जणांना अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून सोमवारी (दि.24) अटक केली आहे. या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी माहिती देताना सोमवारी सांगितले की, या टोळीच्या अटकेमुळे फसवणुकीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीत सुमित्रा गजानन भाकडे (वय.40रा. पापड) येथील महिलेची फसवणूक झाली होती. सोशल मीडियावरील जाहिरातीच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर शेअर मार्केट ग्रुप मध्ये अकाउंट ओपन करण्याच्या नावावर ही फसवणूक झाली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून मुंबई येथील मीना इंटरनॅशनल हॉटेल येथून नऊ आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींमध्ये सुनील हनुमान, विक्रम जिलेसिंग, परान अली, अमन कुमार प्रेमचंद, मो. मरफ मो.हमीद, सौरभ तिवारी, मो. साबीर असुब शेख, फराज खान असिफ खान, विमल काटेकर या नऊ आरोपींचा समावेश आहे. आरोपी हे हरियाणा, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यातील आहेत. त्यामुळे फसवणुकीचे हे रॅकेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील असण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातील वेगवेगळ्या कंपनीचे अठरा मोबाईल, विविध बँकेचे 23 क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, वेगवेगळे चेकबुक, इंडिगो विमानाचे सहा तिकीट, बँकेचा एक स्टॅम्प, तसेच एकूण दोन लाख 28 हजार रुपये रोख जप्त करण्यात आली.

तांत्रिक तपासातून माहिती उघड

गुन्हा दाखल करून या प्रकरणी सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला होता. दरम्यान आरोपी वेगवेगळे मोबाईल वापरून व्हाट्सअप कॉल आणि संदेशद्वारे आपापसात संपर्क साधत असल्याचे आढळून आले होते. त्यांनी दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यात पैसे पाठविले होते. त्यामुळे सदर बँक खात्याची साखळी जोडून मुंबई येथे काही नागरिकांना पोलिसांकडून विचारपूस करण्यात आली. यावेळी असे गुन्हे करणारे आरोपी हे भारतातील व भारताबाहेरील नवयुवक आणि गरजू लोकांना पैसे कमवण्याचे आमिष देत असल्याचे दिसून आले.

विशेषतः हा सर्व प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होता. आरोपी हे विविध बँकेचे खाते उघडण्यास सांगत होते. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांचे पैसे या टोळीतील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचत असल्याचे देखील पोलिसांना आढळून आले. त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथून हॉटेल मीना इंटरनॅशनल मधून नऊ आरोपींना अटक केली. आता त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पुढील तपासाच्या अनुषंगाने या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र एटीएसकडे देखील देण्यात आली आहे असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT