अमरावती : कौटुंबिक वादातून जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे लोखंडी पाईपने प्रहार करून मुलाने स्वतःच्या वडिलांचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. १२) ही घटना उघडकीस आली असून, आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याच्या या घटनेने गावकर्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत माणिक यशवंतराव सोसे (वय ७५) यांनी आपल्या दोन मुलांविरुद्ध खाऊटीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने भरणपोषणाची रक्कम न भरल्याने त्यांच्या विरोधात पकड वॉरंट काढले होते.
नंतर ती रक्कम भरल्यानंतरही आरोपी महेश माणिक सोसे (लहान मुलगा) याने ही गोष्ट मनावर घेतली होती. शुक्रवारी महेश याने वडिलांसोबत वाद घालत संतापाच्या भरात लोखंडी पाईपने डोक्यावर प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या माणिक सोसे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मोठा मुलगा गोपाल माणिक सोसे (वय ४२, रा. पिंपरी पूर्णा) यांनी तक्रार दिल्यानंतर, चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी महेश माणिक सोसे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.