Dhaman Snake Egg
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात अनकवाडी येथील सर्पमित्र शुभम विघे याने धामण जातीच्या सापाच्या अंड्यातून पिल्ले बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. तब्बल ७० दिवस काळजी घेतलेल्या या प्रयोगामुळे सर्पमित्राच्या कार्याचे कौतुक होत आहे. सर्प संवर्धनासाठी तालुक्यातील हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे.
कावली वसाड येथे काही दिवसांपूर्वी सर्पमित्र समीर नेवारे यांनी धामण जातीचा साप रेस्क्यू केला होता. सायंकाळ झाल्याने तो साप सुरक्षितरीत्या बरणीत ठेवण्यात आला. त्यावेळी त्या सापाने अंडी दिली. याची माहिती अनकवाडी येथील अनुभवी सर्पमित्र शुभम विघे याला मिळताच धामण सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. मात्र अंडी त्याच्याकडे सोपवण्यात आली.
शुभम विघे यांनी या अंड्यांबाबत वनविभागाला कळवून त्यांना भुसभुशीत माती व लाकडी भूश्याने भरलेल्या प्लॅस्टिक स्ट्रेमध्ये काळजीपूर्वक ठेवले. नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तब्बल ७० दिवस या अंड्यांची निगा राखल्यानंतर त्यातून निरोगी पिल्ले बाहेर पडली. काही दिवस त्यांची सुरक्षित देखभाल करून अखेर ही पिल्ले (दि.१६) जंगलात सोडण्यात आली. यामुळे सर्पसंवर्धन क्षेत्रात तिवसा तालुक्याचा लौकिक वाढला आहे. या कामगिरीचे कौतुक होत आहे.
“जेव्हा धामण सापाला सोडले तेव्हा बरणीतील अंडी हस्तगत केली. अंड्यातून पिल्ले बाहेर काढण्यासाठी प्रक्रियेचा पुस्तकातून अभ्यास केला. वनविभागाला माहिती देऊन तब्बल ७० दिवस अंड्यांची काळजी घेतली आणि त्यातून पिल्ले बाहेर काढण्यात यश आले. हा पहिलाच प्रयोग यशस्वीपणे पार पडला.”