अमरावती : शिरजगाव कसबा परिसरात एका निर्घृण हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शिरजगाव ते ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील एका पुलाखाली गुरुवारी (दि.१०) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आला. हातपाय बांधून आणि गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून फेकून देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी (दि. १०) सकाळी काही नागरिकांना पुलाखाली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली एक वस्तू दिसली. संशय आल्याने त्यांनी शिरजगाव कसबा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, त्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे मृत्यू साधारणतः चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
महिलेच्या मृतदेहावरून तिचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असण्याची शक्यता आहे. तिच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी आणि ब्लाऊज असा पोशाख होता. हातात हिरवट-सोनेरी रंगाच्या काचेच्या बांगड्या आणि पायात पैजण (तोरड्या) होते. तिच्या उजव्या हातावर 'दुर्गा' आणि 'अनिल' अशी नावे गोंदलेली आहेत. घटनास्थळावरून एक चप्पलही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, महिलेची ओळख पटवण्यासाठी काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. या वर्णनावरून ओळख पटल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिसांसमोर मृत महिलेची ओळख पटवून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे दुहेरी आव्हान आहे. हातावर गोंदलेल्या नावांच्या आधारे पोलीस तपासाची दिशा ठरवत आहेत. या निर्घृण हत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामाला लागली आहेत.