अमरावती : बँक खात्यांचा गैरवापर करून फसवणूक करणार्या रॅकेटविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैशांचे आमिष दाखवून काही युवकांकडून बँक खाती उघडून घेतल्यानंतर ती खाती त्यांच्या ताब्यात न ठेवता राजस्थान येथे पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) व ३(५) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अभय मोहन कैथवास (वय २२, रा. अवधूत नगर, बनोसा, दर्यापूर जि. अमरावती) आणि सौरभ जोशी (रा. प्लॉट क्र. ४४, बालाजी नगर, सालवा रोड, सांगरिया, जोधपूर, राजस्थान) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुरेश उमेशराव चव्हाण, सूरज सुरेशराव चौखडे आणि आशुतोष सम्राट सोंळके यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र, बनोसा शाखेत खाती उघडण्यास प्रवृत्त केले. मात्र ही खाती संबंधित खातेदारांनी वापरण्याऐवजी आरोपींनी ती राजस्थान येथे पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
या खात्यांचा वापर आर्थिक अथवा सायबर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या संदर्भात पोहेकॉ निवृत्ती बाबुराव बरगट यांनी दिलेल्या लेखी अहवालावरून २५ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.