अमरावती : जिल्ह्यातील वरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्या आई व सावत्र वडिलांनी निर्दयपणे मारहाण करून हेअर कटरने तिच्या डोक्यावरील केस पूर्णपणे कापले. या प्रकरणात वरुड पोलिसांनी (दि.२५) दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ती घरी असताना तिची आई व सावत्र वडील तिची बदनामी करत शिवीगाळ करू लागले. तसेच इतर मुलांसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत तिला पोलिस ठाण्यात जाऊन त्या मुलांविरुद्ध खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. मात्र, पीडितेने खोटे आरोप मान्य करण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही आरोपी संतापले. त्यांनी तिला तिच्याच खोलीत पट्ट्याने बेदम मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता घरातील इलेक्ट्रिक हेअर कटरने तिचे डोके मुंडून तिचा अपमान केला. या अमानुष प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली असून तिने आपल्या आईसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. तेथे तिने कोणत्याही दबावाशिवाय घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिच्या सुरक्षेसाठी तिला शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.
अमरावती बाल कल्याण समिती व महिला व बाल विकास विभागाच्या पत्रांनुसार वरुड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.