अमरावती, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचे बुधवारी (दि.१६) उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनादरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा फटका राज्यमंत्री दर्जा असलेल्या निलेश हेलोंडे पाटील यांना बसला. त्यांना सुरक्षारक्षकांनी आत जाण्यास मनाई केली. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबतचा असमन्वय समोर आला आहे. (Amravati Airport)
यादरम्यान अमरावती विमानतळावरच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बाजाबाची झाली. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांना विमानतळाच्या आत जाण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. यादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. विमानतळासाठी तयार केलेल्या पासेस वरून दुजाभाव करण्यात आला, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
भाजपचे सर्व पदाधिकारी व्हीआयपी पास घेऊन विमानतळाच्या आत मध्ये केले. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या चार जिल्हाध्यक्षांसह महानगर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. जिल्हा प्रशासनाने मुद्दामहून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये प्रवेश का दिला नाही ?, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. सत्तेत सर्व सहभागी असताना केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश देणे आणि आम्हाला प्रवेश नाकारणे हे चुकीचे आहे, असे यावेळी जिल्हाध्यक्ष अरबट म्हणाले.