अमरावती : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने गुरुवारी (दि.12) अमरावतीत छाया नगरातून एका युवकाला ताब्यात घेतले आहे. राजापेठ पोलिसांच्या मदतीने एनआयए ने पहाटे साडेतीन वाजताच ही कारवाई केली.
संशयित युवकाची सध्या चौकशी सुरू आहे. छाया नगरातील हा युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील काही संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यापूर्वी 2022 मध्ये एनआयए चे पथक अमरावतीत उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी आले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेने छाया नगरातील युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणात अद्याप पोलीस किंवा यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.