अमरावती: मेळघाटाच्या घनदाट जंगलातून धावणाऱ्या धारणी-परतवाडा टपाल बसला आज (शनिवार) सकाळी मांगीयाजवळ अपघात झाला. चालकाच्या समयसूचकतेमुळे आणि दैव बलवत्तर असल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळून थांबली, ज्यामुळे बसमधील सुमारे ३० प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, बसचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावती आगाराची बस (क्र. एमएच २० जीसी ३८६०) धारणीहून परतवाड्याकडे निघाली होती. हरीसाल आणि कोलकास दरम्यानच्या घाटवळणाच्या रस्त्यावर, मांगीयाजवळ अचानक बसच्या इंजिनचा बेल्ट लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, अशी माहिती चालक प्रल्हाद खानदाते यांनी दिली. नियंत्रण सुटलेली बस थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. पावसामुळे निसरडा झालेला रस्ता आणि घाटवळण यामुळे अपघाताची तीव्रता वाढण्याची शक्यता होती, मात्र झाडामुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली.
अपघातस्थळ घनदाट जंगलात असल्याने आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने मदतकार्यात सुरुवातीला अडथळे आले. अपघातानंतर सुमारे अर्ध्या तासाने आलेल्या दुसऱ्या बसमधून प्रवाशांना सुखरूप पुढे पाठवण्यात आले. एका बस चालकाने परतवाडा येथे पोहोचून अपघाताची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच अमरावती आगाराचे अधिकारी पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. बसचे चालक आणि वाहक अधिकाऱ्यांची वाट पाहत घटनास्थळीच थांबून होते. या अपघाताने मेळघाटातील धोकादायक वळणे आणि पावसाळ्यातील प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.