Kutir Sari | मेळघाटातील 'कुटीर' साडीला जागतिक स्तरावर मान्यता!  
अमरावती

Kutir Sari | मेळघाटातील 'कुटीर' साडीला जागतिक स्तरावर मान्यता!

ऑस्ट्रेलियन नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओ'नील यांनी परिधान करत केले कौतुक

पुढारी वृत्तसेवा

अमरावती:अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर (दि.३१) मोठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या महिलांनी तयार केलेल्या ‘कुटीर’ ब्रँडच्या साडीने जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडला आहे.

दिल्ली येथे आयोजित 'लिव्ह वेल, लिव्ह नॅचुरली' या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आरोग्य व नैसर्गिक जीवनशैली प्रचारक ऑस्ट्रेलियन बार्बरा ओ'नील यांनी ही कुटीर साडर परिधान करत तिचे कौतूक केले आहे.

बार्बरा ओ'नील यांना ही सोलर चरखा कापडापासून तयार केलेली आकर्षक साडी भेट देण्यात आली होती. या साडीची उत्कृष्ट गुणवत्ता, सौंदर्य आणि अप्रतिम हस्तकला पाहून बार्बरा ओ'नील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी मुंबई येथील त्यांच्या पुढील मोठ्या कार्यक्रमात हीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले.

धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या या उत्पादनाला मिळालेली ही जागतिक पसंती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचा क्षण ठरली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांना केवळ रोजगारच मिळाला नसून, त्या स्वावलंबन आणि सन्मानाने शाश्वत विकासाकडे पाऊल टाकत आहेत. अमरावतीचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले की, 'मेळघाटातून जगभर' हा प्रवास आता केवळ एक स्वप्न राहिले नसून, ग्रामीण महिलांच्या हातांनी विणलेली ती एक प्रेरणादायी यशोगाथा बनली आहे, ज्यामुळे ‘कुटीर’ ब्रँडला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT