Amravati Melghat farmer saved by cows and bulls
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली वन्यप्राण्यांची दहशत आता नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. वाघांच्या हल्ल्यांनी अद्यापही लोकांच्या जखमा भरल्या नाहीत, तर आता अस्वलाने देखील आपला रौद्र अवतार दाखवायला सुरुवात केली आहे. चिखलदरा तालुक्यातील जारीदा वनपरिक्षेत्रातील घाना गावात घडलेल्या एका ताज्या घटनेने परिसर पुन्हा हादरला आहे.
गुरुवारी (दि.४) शेतकरी आजू हिराजी जामुनकर (वय ५५) हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना जंगलातून अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. अस्वल पूर्ण ताकदीने त्यांच्यावर झडप घालत असताना, शेजारी असलेल्या त्याच्या गाय-बैलांनी शौर्य दाखवत अस्वलाला हुसकावून लावले. त्यांच्या या धाडसामुळे जामुनकर यांचा जीव थोडक्यात वाचला, मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेळघाट परिसरात गेल्या ६ महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा आदिवासींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आधीच भीतीच्या सावटाखाली असलेले आदिवासीबांधवांना, आता अस्वलाच्या हल्ल्यामुळे अधिक असुरक्षित वाटू लागले आहेत. वन्यप्राण्यांच्या सततच्या उपस्थितीमुळे गावकरी दिवसा सुद्धा शेतात जायला घाबरू लागले आहेत.