Melghat Crime news Pudhari Photo
अमरावती

मेळघाटात पुन्हा अमानुष प्रकार ! २२ दिवसांच्या बाळाला गरम सळईने चटके

Melghat Crime news | चिखलदरा तालुक्यात अंधश्रद्धेतून मानवतेला काळिमा फासणारी घटना, पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे चटके किती दाहक असू शकतात, याचा वेदनादायी प्रत्यय मेळघाटात पुन्हा एकदा आला आहे. चिखलदरा तालुक्यात पोट फुगल्याच्या आजारावर उपचार करण्याच्या नावाखाली अवघ्या २२ दिवसांच्या नवजात बाळाला गरम सळईने पोटावर चटके दिल्याचा धक्कादायक आणि अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील २२ दिवसांच्या बाळाचे पोट अचानक फुगले होते. त्यावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी, जादूटोणा झाल्याच्या संशयावरून कुटुंबीयांनी त्याला एका स्थानिक तांत्रिकाकडे नेले. त्या तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार, बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके देण्यात आले.

  • अंधश्रद्धेतून चिखलदरा तालुक्यात घडली मानवतेला काळिमा फासणारी घटना.

  • पोट फुगल्याने रुग्णालयात नेण्याऐवजी तांत्रिकाकडे नेले, बाळाची प्रकृती गंभीर.

  • पोलिसांकडून महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

या अघोरी प्रकाराची माहिती मिळताच अचलपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळाच्या कुटुंबीयांची चौकशी केली. बाळाच्या आईने स्वतः पोलिसांसमोर कबूल केले की, बाळ बरे व्हावे या भोळ्या आशेने त्यांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला. पोलिसांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत याला ‘उपचार नव्हे, तर अघोरी अत्याचार’ म्हटले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम (अंनिस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मेळघाटात आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, येथील लोकांचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेपेक्षा तंत्र-मंत्र आणि अघोरी उपायांवर अधिक विश्वास आहे. यापूर्वीही मेळघाटात अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. सध्या ते बाळ शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे, आणि दुसरीकडे, या अघोरी प्रथेला मुळापासून उखडून टाकण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर पुन्हा एकदा उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT