अमरावती

Anandeshwar Temple : लासूरचे ऐतिहासिक 'श्री आनंदेश्वर मंदिर' : हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अजोड नमुना

काळ्या पाषाणात उभारलेला यादवकालीन वारसा आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : ऐतिहासिक वारसा आणि हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अजोड नमुना असलेले दर्यापूर तालुक्यातील लासूर येथील श्री आनंदेश्वर मंदिर आजही पर्यटकांना आणि भाविकांना भुरळ घालत आहे. १३ व्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली. पूर्णपणे काळ्या पाषाणात (बेसाल्ट) बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर बांधताना कोठल्याही सिमेंट किंवा चुन्याचा वापर न करता, केवळ दगडात उभारणी करण्यात आली आहे.

मंदिराच्या मध्यभागी असलेला 'स्वर्ग मंडप' हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. या मंडपाला छत नसून वरून थेट आकाश दिसते, जे स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार मानला जातो. हे मंदिर 'त्रिदल' स्वरूपाचे असून यात तीन गाभारे आहेत. मुख्य गाभार्‍यात महादेवाचे प्राचीन शिवलिंग आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभांवर देवी-देवता, नर्तकी आणि विविध वाद्यांचे वादन करणार्‍या कलाकारांच्या अत्यंत सूक्ष्म प्रतिमा कोरलेल्या आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेले हे मंदिर एक राष्ट्रीय स्मारक आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांच्या मते, या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटनाच्या दृष्टीने हवा तसा विकास झालेला नाही. मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसरात भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी वारंवार होत आहे.

पर्यटकांसाठी पर्वणी

अमरावतीपासून साधारण ६० किमी आणि अकोल्यापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला भाविकांची मोठी रिघ लागते. पूर्णा नदीच्या काठी वसलेले हे शांत आणि पवित्र ठिकाण इतिहासाच्या पाऊलखुणा जपून आहे.

मंदिरात एकूण १८ खांब

अष्टकोणी आकाराचे हे मंदिर जणू भल्या मोठ्या रथाला हत्ती जुंपला असावा, अशाच स्वरूपाचे दिसते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडीपाड़वा एकावर एक रचून करण्यात आले असून प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आले आहे. आनंदेश्वर महादेव मंदिरात एकूण १८ खांब आहेत. यापैकी बारा खांब खुले असून सहा खांब हे भिंतींमध्ये आहेत. प्रत्येक खांबावर अतिशय बारीक आणि शिलाईदार कोरीव काम आहे. मंदिरात एका गाभार्‍यात शिवलिंग आहे, तर पूर्व आणि पश्चिमेकडे बांधण्यात आलेल्या गाभार्‍यांमध्ये कोणत्याही मूर्ती नाहीत. याठिकाणी अनेक कोरीव दगड पडलेले असून या गाभार्‍यांमध्ये स्थापन केल्या जाणार्‍या मूर्तीचे काम अर्धवट राहिले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या बाहेर भिंतीवर अनेक कोनाडे असून त्यामध्ये विष्णू, शिव, ब्रम्हा, राधाकृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मूर्ती आहेत. यासोबतच हत्ती, घोडे, लढवय्ये, डोंबारी, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती आदी अनेक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

दर्यापूर तालुक्यात येणारे लासूर येथील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हेमाडपंथी शैलीचे आनंदेश्वर अर्थात महादेव मंदिर असून मदिर पाहणारा थक्क होईल, अशीच याची रचना आहे. अष्टकोनी आकाराच्या या मंदिरावर छत नाही. याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त सप्ताह सुरू असून कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम सुरू आहेत. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिर परिसरात अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यातील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT