अमरावती, पुढारी वृत्तसेवा
आग लागलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःला झोकुन देत सिलेंडर बाहेर काढून जय अंबा अपार्टमेंटच्या 70 कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करिना थापाच्या धाडसाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एका समारंभात करीनाला या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
धुरांचे लोट, गरम टाईल्स आणि श्वास गुदमरवणाऱ्या स्थितीचा यशस्वी सामना करून आपले अपार्टमेंट आगीपासून वाचविण्यासाठी धाडसाचा परिचय देणाऱ्या करीना थापा हिला (वय 17 वर्ष) राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. समयसूचकता व धाडसाच्या जोरावर तिने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून अपार्टमेंटचे रक्षण केले होते.
शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावरसिंह आणि साहिबजादा फतेहसिंह यांनी देशासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतीचे स्मरण म्हणून 26 डिसेंबर रोजी देशात ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. याच औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान- तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कतृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुला-मुलींची विविध निकषांच्या आधारे निवड केली जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कठोरा परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कुल शेजारील जय अंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 च्या सायंकाळी 6 वाजता आग लागून दुर्घटना घडली होती. अपार्टमेंटच्या 'बी-विंग' मधील दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमधून धूर निघत असल्याचे दिसताच घरकाम करणाऱ्या करीना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या बादल्यांचा सतत मारा करत तीने सिलेंडरजवळील आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले. अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता. करीनाच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले.
या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकतेचा परिचय देणाऱ्या करिनाच्या या अनन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सर्व निकषांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली आहे.