Illegal cattle smuggling busted in Amravati: 62 animals and a truck seized
अमरावती : शहर गुन्हे शाखेने गुरुवारी ४ सप्टेंबर रोजी लालखडी रिंगरोडवर अवैध गोवंश वाहतूक करणार्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल २७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ६२ जनावरे आणि एक ट्रक हस्तगत झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे. शेख नासीम कुरेशी शेख हकीम कुरेशी (वय ३६, रा. बंदे नवाज नगर, नागपूर) व शेख वकील शेख हुसेन शेख (वय ४५, रा. आजाद नगर, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे ट्रक (एमएच २७ एक्स ८८८६) पकडण्यात आला. तपासणी दरम्यान त्यात ६२ गोवंश आढळली. त्यातील ५१ जिवंत, तर ११ मृत अवस्थेत होती. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि गौरक्षण संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. ट्रक मालक आवेज खान रहीम खान (वय २५, रा. बिसमिल्ला नगर, अमरावती) फरार झाला आहे. आरोपींवर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल कडू, महेश इंगोले, मनिष वाकोडे यांच्यासह तब्बल २५ पेक्षा जास्त पोलिसांनी केली.