अमरावती : महाविकास आघाडीला ईव्हीएमवर ऑब्जेक्शन असेल तर अमरावतीच्या काँग्रेस खासदारांनी राजीनामा द्यावा,बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. दोन्ही ठिकाणी बॅलेट वर मतदान घेण्यात यावे, असे आव्हान माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी रविवारी (दि.८) दिले आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीच्या चांगल्या सीट्स निवडून आल्या त्यावेळेस ईव्हीएम बरोबर होते. तेव्हा लोकशाही जिवंत होती. लोकसभेच्या वेळेस निकाल लागल्यावर आम्ही त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी कोणीही बाहेर निघालो नाही. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला ईव्हीएम वर शंका येत असेल तर अमरावतीच्या काँग्रेस खासदारांनी राजीनामा द्यावा, आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणादेखील राजीनामा देतील. एकदाचं बॅलेट वर मतदान होऊन जाऊ द्या, असे देखील नवनीत राणा म्हणाल्या.
महाविकास आघाडी कडून राज्यात ईव्हीएम विरोधी आंदोलन सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ जारी करून महाविकास आघाडीला हे आव्हान दिले आहे.