अमरावती शहरातील वल्लभ भवनसह तीन दुकानांमध्ये शुक्रवारी (दि.३१) भीषण आग लागली.  Pudhari Photo
अमरावती

अमरावतीत वल्लभ भवनसह तीन दुकानात अग्नितांडव

दोन मजुरांना वाचवले, लाखोंचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शहरातील अत्यंत वर्दळीच्या सरोज चौक ते जवाहर गेट मार्गावर असलेल्या वल्लभ भवनसह तीन दुकानांमध्ये शुक्रवारी (दि.३१) भीषण आग लागली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन विभागाच्या वाहनाने तत्काळ घटनास्थळावर पोहोचून आग आटोक्यात आणली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. वल्लभ भवन दुकानात काम करणार्‍या दोन मजुरांना वाचविण्यात यश आले.

शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता वल्लभ भवन या दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी दुकानदाराला माहिती दिल्यावर तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. पाहता-पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले. नॉवेल्टी जनरल स्टोअर आणि संतान किड्स केअरला देखील आगीने आपल्या कवेत घेतले. यावेळी नागरिकांची बरीच गर्दी इथे जमली होती. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस पथकाला बोलविण्यात आले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत लाखोंचे नुकसान झाले होते. वल्लभ भवन मध्ये वरच्या मजल्यावर काम करणार्‍या दोन मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक मजूर किरकोळ जखमी आहे.

घटनेचे गांभीर्य पाहून डीसीपी गणेश शिंदे, कोतवालीचे पीआय मनोहर कोटणाके हे घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले. आवश्यक निर्देश दिले. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचा तपास केला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके घटनास्थळावर पोहोचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT