File photo
अमरावती

पिकअप-दुचाकीच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

वरुड तालुक्यात रवाळा येथे भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : पिकअप-दुचाकीच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही घटना वरुड तालुक्यातील रवाळा गावात मंगळवारी ११ फेब्रुवारीला घडली. यात भगवान बिहारे आणि त्यांचा मुलगा मिलिंद बिहारे (रा.गव्हाण कुंड) यांचा जागीच मृत्यू झाला.

अधिक माहितीनुसार, वन विभागाने वरुड तालुक्यातील रवाळा मार्गावर २०० मीटर पर्यंत कचरा जाळला होता. यामुळे रस्त्यावर धूर पसरला. दरम्यान याच मार्गावर मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान पिकअपच्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणाने चालवून गव्हाणकुंड ते शेंदुर्जना घाट कडे जाणार्‍या भगवान आणि मिलिंद बिहारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की , मिलिंद बिहारे जाळलेल्या कचर्‍यावर जाऊन पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील भगवान बिहारे यांचा पाय तुटल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. काही वेळानंतर उपचाराअभावी त्यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच शेंदूरजनाघाट पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक महाडिक पथकासह घटनास्थळावर पोहोचले. यावेळी नागरिकांची बरीच गर्दी झाली होती. अपघातानंतर आरोपी पिकअप चालक सरळ पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला अटक केली. दोन्ही मृतदेह वरुड उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे गव्हाणकुंड गावात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT