अमरावती: बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आली आहे. कामासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या एका नराधम बापानेच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचा ४० वर्षीय आरोपी वडील मध्य प्रदेशातील खंडवा येथून परतवाडा-कांडली परिसरात मजुरीसाठी आले होते. २० जुलै रोजी दुपारी पीडिता घरात अभ्यास करत असताना आरोपी वडील जेवणासाठी घरी आले. मुलीने जेवण वाढून दिल्यानंतर ती अभ्यासाला बसली असता, नराधम बापाने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला.
या भयंकर प्रकारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र, तिने हिंमत दाखवून दुसऱ्या दिवशी, २१ जुलै रोजी, परतवाडा पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणी परतवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.