अपघातात चक्काचूर झालेली दोन्ही वाहने Pudhari Photo
अमरावती

संभाजीनगरजवळ भीषण अपघात; अमरावतीच्या एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : संभाजीनगरातील वाळुजजवळ शुक्रवारी (दि.१३) दोन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात अमरावती शहरातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहे. अपघातात 6 महिन्याचे बाळ, मुलगी, आई आणि आजीचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर अमरावतीसह संपूर्ण जिल्हयात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचे कुटुंबीय हे अमरावती शहरातील सातूर्णा स्थित घनश्याम नगरातील रहिवासी आहेत. या अपघातातील कारमालक विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२) आणि कारचालक कृष्णा कारभारी केरे (वय १९, दोन्ही रा. बलवाल नगर, वाळुज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे अमरावतीचे बेसरकर कुटूंब सध्या पुण्यात राहतात. अमरावतीमध्ये सातुर्णा स्थित घरी ऑगस्ट महिन्यातच त्यांच्या मुलाचा बारशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अजय बेसरकर, मृणाली बेसरकर हे पुण्याला गेले होते. दरम्यान गौरी पुजनानिमीत्त ते दोन दिवसांपूर्वी अमरावतीत आले होते. त्यांच्या एका नातेवाईकांकडे गौरी पुजनाचा कार्यक्रम होता. त्यानंतर अजय अंबादास बेसरकर हे शुक्रवारी (दि.13) पत्नी मृणालिनी, ६ महिन्यांचा चिमुकला, सासू आशा पोपळघट (वय ६५), मेव्हणी शुभांगिनी सागर गिते (वय ३५) व मेव्हणीची मुलगी दुर्गा सागर गिते (वय ७) यांच्यासह कार क्रमांक (एमएच २७ बीझेड ००४५) ने संभाजीनगरमार्गे पुण्याला जात होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिसरात त्यांच्या कारला भरधाव वाहनाने जोरादार धडक दिली. या धडकेत कारमधील मृणाली बेसरकर, आजी आशालता पोपळघाटे, त्यांची नात दुर्गा गिते व मृणाली यांचे सहा महिन्यांचे बाळ हे मृत्यूमुखी पडले, तर अजय बेसरकर व अन्य एका जण जखमी आहे.

१० वर्षांनी घरी चिमुकल्याचे आगमन-

लग्न झाल्यानंतर दहा वर्षांपर्यंत घरात अपत्य झाले नव्हते. अपत्य प्राप्तीसाठी सगळे प्रयत्न झाले. देवाला नवसही केले. अखेर १० वर्षांनी घरी चिमुकल्या मुलगा जन्माला आला होता. बेसरकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. पण हा आनंद देवाने सहा महिन्यातच हिरावून घेतला. अमरावतीमध्ये गौरी पुजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले हे कुटुंब पुणे येथे जाण्यासाठी परत निघाले होते. दरम्यानच संभाजीनगरजवळ त्यांचा अपघात झाला.

मद्यधुंद वाहनचालक-मालकाला अटक

धक्कादायक बाब म्हणजे भरधाव वेगात वाहन चालविणारे ते तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. तसेच त्यांच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे. विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२) आणि कृष्णा कारभारी केरे (वय १९, दोन्ही रा. बलवाल नगर, वाळुज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT