अमरावती

Amaravati Crime : अमरावतीत ड्रग्ज साखळीवर DRIची कारवाई, ५ किलो ‘MD’ जप्त; एकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शहरात अमली पदार्थांच्या अवैध साखळीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रविवारी (दि.१) केलेल्या कारवाईने ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका संशयित फ्लॅटवर अचानक छापा टाकत डीआरआयने तब्बल ५ किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीला वेग आला आहे.

ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीय पद्धतीने राबवण्यात आली. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस यंत्रणेलाही याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. छापा टाकल्यानंतर जप्त मुद्देमाल आणि आरोपीला थेट नवसारी येथील जीएसटी भवनात नेण्यात आले, जिथे फॉरेन्सिक तपासणीसह सखोल चौकशी सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी कारंजा लाड येथे डीआरआयने केलेल्या १९८ किलो एमडी जप्ती प्रकरणाच्या तपासात अमरावतीशी संबंधित काही महत्त्वाचे दुवे समोर आले होते. त्याच तपासाचा हा पुढचा टप्पा असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे या कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

जीएसटी भवन सीलबंद, तपास गुप्त

नवसारी येथील जीएसटी भवन परिसर पूर्णतः बंद ठेवण्यात आला असून, प्रसारमाध्यमे व बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यात आलेला नाही. तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मोठ्या रॅकेटचा सुगावा

या जप्तीतून केवळ स्थानिक नव्हे तर आंतरजिल्हा आणि राज्यस्तरीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास डीआरआयचे एक पथक पुढील कारवाईसाठी जीएसटी भवनातून रवाना झाल्याची माहिती आहे. डीआरआयची छापा कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपास पूर्णतः गोपनीय असल्याने डीआरआयने कोणताही तपशील शेअर केला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप न करता तपासात सहकार्याची भूमिका घेतली.

एमडी ४ किलो ९०० ग्रॅम, किंमत पाच कोटी

जवळपास पाच किलो म्हणजेच ४ किलो ९०० ग्रॅम जप्त केलेल्या एमडी (मेफेड्रॉन) ची किंमत सुमारे ४ कोटी ९० लाख आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ड्रग्ज माफियांचे अमरावतीत मोठे कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. शहरात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नागपूर येथील ‘डिआरआय’चे तीन वेगवेगळे पथक रविवारी दुपारी शहरात आले. या पथकाने त्यांच्याकडे असलेल्या ठोस माहीतीच्या आधारे दोन ते तीन ठिकाणी छापे मारले. या कारवाईमध्ये त्यांना ४.९०० किलो एमडी जप्त करण्यात यश आले. दरम्यान, अडीच महिन्यांपूर्वी डिआरआयच्या नागपूर व मुंबई पथकाने वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा घाडगे येथे एमडी तयार करण्याचा अवैध कारखाना उध्वस्त केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT