अमरावती : लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेलोरा गावातील १६ वर्षीय मूकबधिर मुलगा तब्बल आठ दिवसांपासून बेपत्ता होता. बुधवारी (दि.१) त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत झुडपी जंगलात आढळून आला. जंगली प्राण्यांनी त्याच्या शरीराचे काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेलोरा येथील सुजल बंडु खंडारे (वय १६) हा २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला होता. तो जन्मतः मूकबधिर होता. बोलूही शकत नव्हता आणि ऐकूही शकत नव्हता. त्याच्या बेपत्ता झाल्यानंतर लोणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिस त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी काही ग्रामस्थ जंगलाच्या दिशेने जात असताना झुडपात मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी मृतदेह पाहिला असता तो पूर्णपणे सडलेला होता आणि प्राण्यांनी शरीराच्या काही भागांचे लचके तोडले होते. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून त्यांनी विविध ठिकाणाहून पुरावे गोळा केले आहेत.
सुजल खंडारेचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबतचा खुलासा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लोणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.