ST Bus Truck Collision
अमरावती: दर्यापूर-अमरावती मार्गावरील लखापूर ते आराळा फाट्यादरम्यान एसटी बस आणि भरधाव आयशर ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. गुरुवारी (दि. ३०) घडलेल्या या अपघातात एका ३१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, एसटी बसचे चालक व वाहकासह सात जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर येथून हिंगणघाट कडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 49 AQ 6458) दर्यापूर-अमरावती मार्गाने जात असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकशी (क्रमांक MH 27 BX 0800) तिची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जबर होती की ट्रकच्या चालकाच्या बाजूला बसलेला शाम महादेव बुटे (वय ३१, रा. धामोरी, ता. भातकुली) याचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकमधील तुळशीराम अशोक कुपटे (वय २६, रा. खोलापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच एसटी बसचे चालक गजानन तुळशीराम पाणीरे (वय ४२, रा. खारतळेगाव) आणि वाहक संजय अर्जुन वानखडे (वय ४०, रा. आराळा) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.
ट्रक चालक विशाल खोडे (वय ३०, रा. मधलापूर) याच्यासह बसमधील प्रवासी मनोज महादेव तायडे (वय ४४, रा. साईनगर, दर्यापूर), मनिष सखाराम चिमोटे (वय २२, रा. परतवाडा) आणि प्रफुल कडू (रा. बनोसा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गोपाल पाटील अरबट, राहुल भुंबर, सचिन शेलारे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बस व ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. गुंजन गुल्हाने, डॉ. गुणवंत जढाळ, अधिपरिचारिका शुभांगी राणे, मिनल बागडे, नितीन धुंदे व वैद्यकीय टीमने जखमींवर तातडीने उपचार केले. घटनेची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.